औरंगाबाद: गेले आठवडाभर ४० सेल्सिअस दरम्यान असलेले तापमान काल पुन्हा ४१.२ डिग्री सेल्सिअस वर जाऊन पोहोचले. त्यामुळे शहरवासीय पुन्हा उष्णतेने घामाघुम झाले आहेत. भारताच्या पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीवर आदळलेल्या फोनी वादळामुळे तापमानात बदल झाला होता. आठवडाभरापूर्वी ४३.८ वर जाऊन पोचलेले तापमान चाळीसच्या घरात आले. त्यामुळे शहरवासीयांना घामाघूम करणाऱ्या उष्णतेपासून काहीशी मुक्ती मिळाली होती. फोनी वादळाचा प्रभाव उतरल्यानंतर आता कालपासून पुन्हा तापमानाचा पारा चढतो आहे. काल दिवसभर उष्णतेने शहरवासीयांना हैरान केले. कालचे कमाल तापमान ४१.३ तर किमान २९ अंश सेल्सिअस एवढे होते. आजही सकाळी साडेअकराच्या सुमारास तापमान ३५ अंश सेल्सिअस राहिले. दुपारनंतर तापमानात वाढ होईल त्यामुळे आजही तापमान ४२ अंश सेल्सिअस च्या घरात राहील असा अंदाज आहे.